औषधनिर्मिती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव; व्यावसायिक शिक्षणाला नवे दालन.
नाशिक : शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ (एरंडोल) येथील विद्यार्थ्यांनी नाशिकमधील नामांकित ग्लेनमार्क फार्मासिटिकल्स कंपनीला अभ्यासदौरा केला. व्यावसायिक शिक्षण अधिक प्रात्यक्षिक आणि अनुभवाधारित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री आणि उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. ग्लेनमार्क कंपनीचे उत्पादक व्यवस्थापक डॉ. किरण पाटील यांनी या दौऱ्यासाठी विशेष परवानगी दिली होती. एकूण ९० विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीत सहभाग घेतला.
औषधनिर्मितीचा सखोल अभ्यास
विद्यार्थ्यांना कंपनीतील विविध विभागांना भेट देण्याची संधी मिळाली. टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, ऑइंटमेंट, पावडर आणि जेल या उत्पादन प्रक्रियांशी संबंधित माहिती तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिली. एच.आर. मॅनेजर श्रेया तिवारी यांनी कंपनीतील कामकाजाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली तसेच उद्योग क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन केले.
या अभ्यासदौऱ्यादरम्यान प्राध्यापक मंगेश पाटील, करण पावरा, अनिता वडवी, पूर्वा पापरीकर आणि कीर्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळली. कंपनी व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना उत्तम सहकार्य केल्याने महाविद्यालयातर्फे डॉ. किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सहलीसह ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट
औद्योगिक दौऱ्यानंतर विद्यार्थ्यांसाठी रांजणगाव गणपती, महाबळेश्वर, प्रतापगड, मुरुड जंजिरा, रायगड, गणपतीपुळे, काशीद बीच (अलिबाग) आणि जेजुरी या ठिकाणी अभ्याससहलीचे नियोजन करण्यात आले. ८१ विद्यार्थी आणि ५ प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळे, निसर्गसौंदर्य, तसेच विविध पर्यटनस्थळांबद्दल माहिती मिळवत ज्ञानात भर टाकली. शैक्षणिक सहलीचे यशस्वी नियोजन प्रा. मंगेश पाटील, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वडवी, प्रा. पूर्वा पापरीकर आणि प्रा. कीर्ती पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक दौऱ्याचा औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, व्यावसायिक कौशल्यांचा विकास आणि ऐतिहासिक वारसा समजून घेण्याच्या दृष्टीने मोठा लाभ झाला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राचा जवळून परिचय होत असून त्यांना भविष्यातील संधींसाठी अधिक सज्ज होता येते, असे मत शिक्षकवर्गाने व्यक्त केले.
Post a Comment