आदर्श शिक्षिका व आदर्श समुपदेशक म्हणून प्रतिष्ठेचा गौरव.
अमळनेर: खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती प्रमोदिनी बळीराम पाटील यांना दिल्ली येथील नॅशनल अचीवर रिकग्नायझेशन फोरम टीम, झेनिथ इंटरनॅशनल आणि इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा "आदर्श शिक्षिका व आदर्श समुपदेशक" हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून 9 मार्च 2025 रोजी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे भव्य समारंभात हा पुरस्कार देण्यात आला.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मान..
हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, तीन राज्यांच्या माजी राज्यपाल कमलाताई गवई, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर आणि खासदार बलवंत वानखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.** यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मित्तल, अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरेखा लामतुरे तसेच अनेक नामवंत मान्यवर उपस्थित होते.
पाच जिल्ह्यांमधील एकमेव मानकरी...
या राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाच जिल्ह्यांमधून केवळ श्रीमती प्रमोदिनी पाटील यांची निवड झाली, ही अमळनेर व खान्देशसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. याआधीही त्यांना महावीर आंतरराष्ट्रीय फाउंडेशन, नाशिक यांच्याकडून आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तीन दशके समर्पित शिक्षण सेवा...
श्रीमती प्रमोदिनी पाटील यांनी 1990 पासून प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून कार्य केले. त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षा तयारी यांसाठी विशेष योगदान दिले आहे. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोटीच्या आधारे व्यवसाय मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी दिशा दिली आहे.
महत्त्वाची कार्यक्षेत्रे:
- एस.एस.सी. बोर्ड परीक्षांचे केंद्र संचालक व समुपदेशक म्हणून कार्यरत
- 25 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या समुपदेशक समितीवर योगदान
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअर मास्टर, शिक्षक प्रशिक्षण शिबिरे यांचे आयोजन
- भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा, सत्यशोधक प्रज्ञाशोध परीक्षा यांचे नियोजन
- आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विज्ञान व व्यवसाय प्रदर्शनांचे आयोजन
- लोकमत समूहाच्या महिला व बाल विकास मंचच्या तालुका समन्वयक पदावर कार्य
- दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन सहकार्य
"आधुनिक सिंधुताई सपकाळ" म्हणून गौरव
त्यांच्या समर्पित योगदानाची दखल घेत धनगर साहेब यांनी त्यांना "आधुनिक सिंधुताई सपकाळ" अशी उपाधी देऊन गौरवले आहे.
कोविड काळातील उल्लेखनीय योगदान...
2020-22 च्या कोविड कालावधीत त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना परीक्षेच्या तणावातून मुक्त करण्यासाठी समुपदेशन व मार्गदर्शन दिले.
अमळनेरसाठी अभिमानाचा क्षण...
श्रीमती प्रमोदिनी पाटील यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अमळनेर आणि खान्देश भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Post a Comment