एरंडोलमध्ये उद्योगविकासाला चालना; आमदार अमोल पाटील यांची एमआयडीसीसाठी ठोस पावले.

एरंडोलमध्ये उद्योगविकासाला चालना; आमदार अमोल पाटील यांची एमआयडीसीसाठी ठोस पावले.

एरंडोल व उमर्दे परिसरात प्रस्तावित जमीन सर्वेक्षण पूर्ण; बेरोजगारी निवारणासाठी प्रकल्पाला मिळणार गती.

एरंडोल (प्रतिनिधी): एरंडोल व परिसरातील नागरिकां साठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येथील एमआयडीसी प्रकल्पासाठी आवश्यक सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. या संदर्भात आमदार अमोल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले की, 

“एरंडोल व उमर्दे शिवारातील जमीन एमआयडीसी प्रकल्पासाठी प्रस्तावित करण्यात आली असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बेरोजगारीच्या समस्येवर तो प्रभावी मार्ग ठरेल.”

माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळात देखील या प्रकल्पासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, काही कारणांमुळे तो प्रलंबित राहिला होता. सध्याचे आमदार अमोल पाटील यांनी या विषयाला प्राधान्य देत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचे फलित म्हणून शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेतला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

या व्यतिरिक्त, आमदार पाटील यांनी एरंडोल तालुक्यातील अन्य महत्त्वाच्या विकासकामांची माहितीही दिली. पद्मालय क्रमांक २ व अंजनी मध्यम प्रकल्प यांसाठी लागणारा निधी लवकरच उपलब्ध होईल. त्यामुळे रखडलेली कामे पूर्णत्वास जातील.

परिवहन क्षेत्रातही लक्षणीय बदल घडून येणार आहेत. एरंडोल बस आगारात लवकरच १० नवीन बसगाड्या दाखल होणार असून, प्रवाशांना आरामदायी व नियमित सेवा मिळण्यास मदत होईल. याचबरोबर, बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. “नवीन बसस्थानक हे आधुनिक सोयींनी सुसज्ज असेल आणि जिल्ह्यातील एक उत्कृष्ट नमुना ठरेल,” असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला शिंदे गटाचे नेते शालिग्रामभाऊ गायकवाड, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, तसेच स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post