शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार; भाविकांचा मोठा सहभाग.
संगमनेर (प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत गोमातेला पूजनीय स्थान असून ती ३३ कोटी देवतांचे निवासस्थान मानली जाते. या श्रद्धेच्या भावनेतून श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराज मठ, पळसखेडे येथे स्वामिनी नावाच्या गोमातेचा पंचक्रिया विधी भावपूर्ण वातावरणात आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला.
मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मठात देशी गायींचे संगोपन केले जाते. त्यातील स्वामिनी गोमातेचे नुकतेच निधन झाले. तिने गेल्या तीन वर्षांत अनेक भाविकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. तिच्या सेवेसाठी भाविक मोठ्या श्रद्धेने चारापाणी करीत असत. तिच्या निधनानंतरही तिचा सन्मान राखत विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोमातेचा सन्मान – एक आदर्श उदाहरण
गोमातेच्या पंचक्रिया विधीच्या प्रसंगी ह. भ. पल्लवीताई वाकचौरे यांनी प्रवचनाच्या माध्यमातून गोसेवेचे महत्त्व पटवून दिले. "गोमाता ही केवळ जनावर नसून ती आपली आईसमान आहे. जसे आपल्या आईचे आपण विधी करतो, तसेच गोमातेचेही करायला हवे," असे त्यांनी सांगितले.
तसेच, गोमातेला शास्त्रोक्त पद्धतीने अंतिम संस्कार न करता तिला दुर्लक्षित करणे किंवा टाकून देणे ही चुकीची प्रथा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुक्या जीवांचे संगोपन व सेवा केल्यास तेही आपल्यावर प्रेम करतात आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
या विधीसाठी गावातील ग्रामस्थ, स्वामी सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अन्नदान व पिंडदानही करण्यात आले. स्वामी समर्थ मठाने गायीच्या शेवटच्या क्षणांपर्यंत तिचा सन्मान राखण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
मठाधिपती प्रदीप दादा सोनवणे यांनी गोसेवेचा आदर्श घालून दिला असून, भविष्यातही मठात गोसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. गोमातेच्या सेवेसाठी मठात सुरू असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Post a Comment