विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळाला वाव; विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी.
एरंडोल (प्रतिनिधी): एरंडोल येथील डीडीएसपी महाविद्यालयात ‘स्पर्शगंध’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. उद्घाटनप्रसंगी संस्था अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील, डॉ. अरविंद बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ...
संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
"अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळते. शिक्षणासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात चमकण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे."
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विज्ञान प्रश्नमंजुषा आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
रॅम्प वॉकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष..
सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक, नृत्य, फनी गेम्स आणि पारंपरिक खेळ सादर केले. विशेष आकर्षण ठरले उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि महाराष्ट्रीयन पोशाखांतील रॅम्प वॉक, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी प्रभारी प्राचार्य एन.ए. पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉ. स्वाती शेलार, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस. पाटील, पर्यवेक्षक एन.बी. गायकवाड आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.एस. वानखेडे यांनी विशेष मेहनत घेतली.
सूत्रसंचालन प्राची पाटील आणि जयश्री पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिशा ब्राह्मणे यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
महोत्सवाने दिला विद्यार्थ्यांना नवा उत्साह...
‘स्पर्शगंध’ महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला असून, पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात हा महोत्सव साजरा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment