बहुआयामी माध्यमांचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात अभिवादन कार्यक्रम.

बहुआयामी माध्यमांचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील

पत्रकारितेत नवे तंत्र आत्मसात करण्याची गरज – युवराज पाटील.

जळगाव: "भारतीय पत्रकारितेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. बदलत्या काळात केवळ मुद्रित माध्यमांवर अवलंबून न राहता डिजिटल पत्रकारितेतही पत्रकारांनी आपले प्रभुत्व निर्माण करावे, असे त्यांनी सांगितले.

बहुआयामी माध्यमांचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज – युवराज पाटील

युवराज पाटील म्हणाले,
"पत्रकारितेत दिवसेंदिवस मोठी स्पर्धा वाढत आहे. केवळ छापील वृत्तपत्रे किंवा नियतकालिकांपुरते मर्यादित न राहता पत्रकारांनी डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, पॉडकास्ट, व्हिडिओ ब्लॉगिंग यासारख्या बहुआयामी माध्यमांवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. आधुनिक पत्रकारितेत कमी शब्दांत प्रभावीपणे विचार मांडण्याची गरज आहे आणि यासाठी ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवरील संक्षिप्त आणि आशयपूर्ण लेखनशैली अवगत करणे महत्त्वाचे आहे.

"बाळशास्त्री जांभेकर: भारतीय पत्रकारितेचे शिल्पकार.

बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये "दर्पण" हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा प्रवास केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित नव्हता, तर त्यांनी शिक्षण, समाजप्रबोधन आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणांसाठीही मोठे कार्य केले.कार्यक्रमात जांभेकर यांच्या योगदानाचा आढावा घेत ब्रिटिशकालीन पत्रकारिता, स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता आणि आधुनिक डिजिटल पत्रकारिता यातील बदलांवर प्रकाश टाकण्यात आला.

 "पत्रकारांच्या लेखणीला धार हवी"– संदीप घोरपडे

कार्यक्रमात प्रमुख वक्ते संदीप घोरपडे (अमळनेर) यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले."बाळशास्त्री जांभेकर यांना सर्व भाषा समजल्या, पण पैशांची भाषा कधीच समजली नाही. आज मात्र अनेक ठिकाणी पत्रकारितेचा मुख्य उद्देश हरवत चालला आहे. निर्भीड पत्रकारितेची गरज अधिक आहे. पत्रकारांच्या लेखणीला धार असेल, तर आमदार, मंत्रीही घरी बसू शकतात," असे त्यांनी स्पष्ट केले.

मुद्रित माध्यमांचा खप १० कोटींच्या जवळपास – विश्वासार्हता कायम.

आज डिजिटल माध्यमांचा वेग वाढला असला तरी मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता अद्यापही अबाधित आहे. देशभरात वर्तमानपत्रांचा खप १० कोटींच्या जवळपास आहे. त्यामुळे पत्रकारांनी डिजिटल युगात पुढे जात असताना मुद्रित माध्यमांचे महत्त्वही लक्षात ठेवायला हवे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

विजयबापू पाटील यांचा विशेष सन्मान.

कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष विजयबापू पाटील यांचा ७१ व्या वाढदिवसानिमित्त शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी त्यांनी आपल्या पत्रकारितेतील आठवणींना उजाळा देत सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा आढावा घेतला.

  पत्रकार संघाच्या नव्या नियुक्त्या.

कार्यक्रमात जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली:

संघटकपदी – सुरेश पाटील (यावल)
अमळनेर तालुकाध्यक्ष – बापूराव आनंदराव पाटील

याशिवाय एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन आणि आरोग्यदूत युवराज खोखरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री.बी.एस.चौधरी सर हि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिलीप शिरुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post